कुडाळ मध्ये नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचा खा.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार
विरोधकांचे कर्तृत्व शून्य असल्यानेच मोदींच्या नावाने मते मागण्याची त्यांच्यावर वेळ – आ. वैभव नाईक
सतीश सावंत यांनी घेतला सरपंचांचा क्लास
प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कुडाळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील १३० कोटी किंमतीचा भूखंड आपल्या १६ हस्तकांना फक्त २ कोटी रुपयांत दिला.याविरुद्ध काही लोक कोर्टात गेल्याने न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या कृतीवर ताशेरे ओढले. त्या भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यावा लागणार हे जेव्हा सिद्ध झाले तेव्हा लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत.मात्र जी काय चौकशी करायची आहे ती करा असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. आ. वैभव नाईक यांना देखील त्रास देण्यासाठी त्यांच्यावर एसीबी चौकशी सुरु करण्यात आली आहे. राज्य सरकर सूड भावनेतून हे राजकारण करत आहे. मात्र या चौकशीचा आ. वैभव नाईक यांच्यावर कोणताही फरक पडणार नाही. २०२४ मध्येही वैभव नाईकच कुडाळ मालवणचे आमदार असतील असे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या सर्व खुणांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे खास. राऊत यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आज महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे संपन्न झाला. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आ. वैभव नाईक म्हणाले, आम्हाला आमची संख्या खोटी दाखवायची नाही जे शिवसेनेबरोबर येतील त्यांना घेऊन काम करायचे आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व आपल्या अगोदरच्या सरपंचांनी चांगल्या पद्धतीने काम केले. शिवसेनेचा सरपंच निवडून आणण्यासाठी त्यानी मेहनत घेतली. गेल्या काही महिन्यात शिवसेनेवर सर्वच बाजूंनी आघात झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार बिनबुडाचे आरोप होत आहेत. जे भाजप सोबत नाहीत त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. माझ्यावर देखील चौकशी लावली आहे. मात्र ज्या लोकांनी शिवसैनिक म्हणून आपल्याला निवडून दिले त्या नागरिकांबरोबर मी कायम प्रामाणिक राहणार आहे.ग्रा. प निवडणुकीत आम्ही आमच्या कामावर मते मागितली मात्र विरोधकांनी मोदींच्या नावाने मते मागितली. त्यामुळे विरोधकांचे कर्तृत्व शून्य आहे हे दिसून येते. जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवून सरपंच व सदस्य निवडून दिले. याबद्दल आ.वैभव नाईक यांनीजनतेचे आभार मानत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
सतीश सावंत म्हणाले, देशाबरोबरच राज्यात आणि जिल्हयात सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे सरपंचांनी सर्व नियमांचा, सरपंचांच्या अधिकाराचा अभ्यास करून नियमानुसार काम करावे.आपल्या कामावर कोणी आक्षेप घेऊ नये असे काम झाले पाहिजे. नियमित ग्रामसभा लावणे, चौकशी, तक्रार पत्रव्यवहाराला उत्तर देणे, २३ नंबर रस्ता नोंदी योग्य असणे, ग्रामपंचायत फंडाचा योग्य वापर करणे अशा अनेक नियमांची माहिती सतीश सावंत यांनी नूतन सरपंचांना दिली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,नागेंद्र परब,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभरत पालव, अतुल बंगे,कृष्णा धुरी,रमाकांत ताम्हणेकर,सचिन काळप, राजू गवंडे, शेखर गावडे, स्नेहा दळवी, शिल्पा खोत, मथुरा राऊळ, उदय मांजरेकर, दीपा शिंदे, संदीप म्हाडेश्वर आदींसह शिवसेनेचे नवनिर्वाचित सरपंच सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते.