Sindhudurg: उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ज्यांनी वार केला त्यांना सोडणार नाही – खा. संजय राऊत

0
71
उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ज्यांनी वार केला त्यांना सोडणार नाही - खा. संजय राऊत

कणकवलीत एकटे येऊन दाखवण्याचे काहीजणांचे आव्हान पूर्ण केले- खा. संजय राऊत; खासदार संजय राऊत यांचे कणकवलीत जंगी स्वागत

संजय राऊत यांचा प्रत्येक आयटम बॉम्ब विरोधकांची झोप उडवतो- खा. विनायक राऊत; उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट्टेल तो त्याग करू-आ. वैभव नाईक

प्रतिनिधी :पांडुशेठ साठम

कणकवली: बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली.माणसांना सरदार बनवलं त्याच सरदारांनी शिवसेनेच्या पाठीत वार केला. त्यातील एक माकड कणकवलीत आहे. त्याची अवस्था काय आहे ते तुम्ही बघताय. आज मी एकटा मुंबईतून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आलो माझ्यासोबत एकही पोलीस नाही. काहीजण एकटे येऊन दाखवा असे आवाहन देत होते ते पूर्ण केले.हि हिंमत आणि धाडस बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलो. आम्ही छातीवर वार घेणारी माणसे आहोत पाठीत वार करणारी माणसे नाही. मात्र उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ज्यांनी वार केला त्यांना सोडणार नाही असा इशारा शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत यांनी कणकवलीत दिला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खा-संजय-राऊत-यांच्या-दौऱ/

शिवसेनेची मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता कणकवली आप्पा साहेब पटवर्धन चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हार तुरे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित जनतेला संबोधीत केले.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, आमच्यावर कोट्या केसेस टाकल्या जात आहेत.मात्र आम्ही रडत नाही बसलो.भगवा फडकवत तुरुंगात गेलो आणि भगवा फडकवत बाहेर आलो. मरेपर्यत हा भगवा फडकविणार,आ. वैभव नाईक यांच्यावर एसीबीची कारवाई सुरु आहे. जे सरकार भ्रष्ट्राचाराच्या खोक्यातून उभे राहिले आहे. ते आमच्या आमदारांच्या काय चौकशा करणार महाराष्ट्राला भिकारी करण्याचे काम सुरु आहे. राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या महाराष्ट्रात आणि कोकणात काय चाललंय. काल परवा जे कणकवली, सिंधुदुर्गात होत होत ते रत्नगिरीत करण्यात आले. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे आणि आता शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. शिवसेना सत्तेत असताना सिंधुदुर्गातील दहशतवाद मोडून काढला. सिंधुदुर्ग जिह्यात शांतता प्रस्तापित केली. ज्याठिकाणी संघर्ष असतो त्याठिकाणी मी जात नाही. इथल्या सगळ्या विरोधी माकडांना खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक यांनी शेपटी आपटून आपटून मारलं.आता इथे माझी गरज नाही. समोर असलेले शिवसैनिक बांधव विकत आणलेले नाहीत. हे श्रद्धेने निष्ठेने आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम केले. आणि बाळासाहेबांनी या जिल्ह्यावर प्रेम केले. मुंबई आणि महाराष्ट्रात जी शिवसेना उभी आहे त्याची बीजे कोकणच्या भूमीत रोवलेली आहेत.कोकणातील मुंबईत असणाऱ्या माणसांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना उभी केली. बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शिवसेनेचे जे रोपटे लावले त्याचे बीज काय शिंदेच्या घरातून आणले होते काय? मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी बाळाहेबांनी जीवाचं रान केले. ती शिवसेना खतम करण्यासाठी मोदी आणि अमित शहा यांनी कारस्थान रचले आहे.

शिवसेना कोणाची हे ठरवायचे असेल तर जनतेच्या न्यायालयात जाण्याचे आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी दिले आहे. त्यासाठी निवडणुका घ्या. आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ.शिवसेनेच्या स्थापने नंतर देशात २८० वेगवेगळ्या सेना निर्माण झाल्या. पण दोन सेना शिल्लक राहिल्या. त्यातील एक सीमेवरची भारतीय सेना,आणि दुसरी म्हणजे शिवसेना.जे घटना बाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या वर्षा निवासस्थानी गेल्या तीन महिन्यात फक्त जेवणासाठी ३ कोटी रुपये खर्च झाले. तीन महिन्यात माणूस ३ कोटीचे कसकाय जेवतो.हे महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयावर पुन्हा एकदा भगवा फडकवला जाणार आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. या महाराष्ट्रातून बेईमानीची जमात कायमची नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात कोकणात आपल्याला करायची आहे. कणकवली च्या जनतेने अत्यंत प्रेमाने माझे स्वागत केले. त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत हे प्रेम असेच कायम ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

खा. विनायक राऊत म्हणाले, गेली काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा शांतात प्रिय म्हणून ओळखला जात आहे. मात्र काही किडे वळवळत आहेत त्यांना ठेचायचे काम प्रथमेश सावंत सारखे शिवसैनिक करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याला २५ लोकही नव्हती मात्र आज संजय राऊत यांचे स्वागत करायला शेकडो शिवसैनिक आले. हे पैसे देऊन आणलेले नाहीत. संजय राऊत शिवसेनेची ज्वलंत तोफ आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत यांचा प्रत्येक आयटम बॉम्ब विरोधकांची झोप उडवतो. संजय राऊत यांच्या सभेला पत्रकार येऊ नयेत म्हणून नारायण राणेने तातडीने पत्रकार परिषद आयोजित केली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या खात्याचा फुल्ल फॉर्म सांगावा असे आवाहन राऊत यांनी दिले. केंद्रीय खात्याचे कार्यालय राणेंनी आपल्या स्वतःच्या ऑफिस मध्ये सुरु करण्याची अग्रीमेंट केली होती. आम्ही उघड केले म्हणून त्यांचे महिन्याला साडेतीन लाख रु भाडे बुडाले. असा गौप्यस्फोट खा.विनायक राऊत यांनी केला.

आ. वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेच्या कठीण काळात शिवसेनेचा बाणा जर कोणी तेवत ठेवला असेल तर तो संजय राऊत यांनी ठेवला आहे. ना झुके है ना कभी झुकेंगे याच उक्ती प्रमाणे संजय राऊत तुरुंगात गेले परंतु मोदी शहा यांच्यापुढे झुकले नाहीत.कोणासमोर न झुकण्याचा आदर्श संजय राऊत यांनी घालून दिला. आज सत्ता नसली तरी आपल्याला लढायचे आहे हि भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे. संख्येने कमी असू परंतू लढू आणि जिंकू. काही लोक शिवसेना सोडून गेले असले तरी जनता हि आमच्या बरोबर आहे. जे शिवसेना सोडून गेले त्यांना मातीत गाडण्याचे कामजनतेने केले आहे. उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते करू. आम्ही करू वाट्टेल तो त्याग करू आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत एसीबी चौकशी सुरु आहे परंतु आम्ही त्याला नमणार नाही. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा लढू. संजय राऊत यांचा आदर्श घेऊन काम करू असे सांगत आ.वैभव नाईक यांनी खा. संजय राऊत यांचे जिल्हयात स्वागत केले.

यावेळी शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते दत्ता दळवी, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे,बाळा गावडे, अप्पा पराडकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक कन्हैया पारकर, हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, सुदीप कांबळे, प्रमोद मसुरकर, कृष्णा धुरी, सचिन सावंत, सचिन काळप,दीपक चव्हाण, संतोष घाडी, प्रदीप सावंत, राजू गवंडे, मंदार ओरसकर, हर्षद गावडे, अशपाक कुडाळकर,श्वेता सावंत, श्रेया गवंडे , सई काळप शिल्पा सावंत,पूनम चव्हाण, शिल्पा खोत, राजू राठोड, रुपेश आमडोस्कर,प्रदीप नारकर, उत्तम लोके, स्वप्नील शिंदे,किरण शिंदे, रुपेश पावसकर,महेश सावंत, सचिन कदम, रिमेश चव्हाण आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here