कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत असून दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्थानाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी यात्रोत्सव तीन दिवसांचा असून पवित्र तीर्थस्थानाला सोमवती अमावस्या महापर्वणी योग येत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त या यात्रोत्सवाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सामाजिक-कार्यासाठी-नू/
कुणकेश्वर यात्रा ही कोकणातील पुरातन काळापासून चालत आलेली एक धार्मिक परंपरा असून कोकणी माणसाच्या जीवनात याला फार मोठे महत्त्व आहे ते यामुळे की या यात्रोत्सवाला इतर गावचे ग्रामदैवत देवस्वाऱ्या आपल्या गाव रयतेला घेऊन श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी येत असतात व येथील पवित्रतीर्थावर स्नान करत असतात. तसेच या यात्रोत्सवाला देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात त्यामुळे वर्षभर शिवभक्त या यात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.
गेल्या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट असूनही यात्रा पूर्ण क्षमतेने भरविण्यात ग्रामस्थांनी तसेच प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली होती. प्रत्येक वर्षी यात्रेची वाढणारी व्याप्ती व स्वरूप पाहता या यात्रोत्सवाचे नियोजन काही महिने अगोदर पासूनच सुरू होते श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने यात्रेच्या नियोजनाला सुरुवात झाली असून प्रशासनाच्या वतीने ही या यात्रेची यात्रा नियोजन बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या या कोकणकाशीच्या महासोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे कृपाशीर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन कुणकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.