राष्ट्रीय महामार्गांच्या पुर्ततेसाठी सर्वंपक्षिय लढा उभारण्याची गरज
कणकवली : दि. २६- लोकप्रतिनिधींच्या संघटित दबावामुळे राज्यातील अन्य राष्ट्रीय महामार्गांसह समृद्धी महामार्ग आदींची कामे नियोजित वेळेत पुर्ण होत आहेत. मात्र प्रसार माध्यमे वारंवार रस्त्यावर उतरूनही मुंबई कोकण गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सागरी महामार्ग आदी कामांचे भिजत घोंगडे गेली अनेक वर्षें रखडले आहे. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आता सर्वंपक्षिय लढा उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी दादर, मुंबई येथे केले. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-रेल्वे-प्रवाशाच्या-खिश/
कोविआचे ४४ सावे अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील शारदाश्रम हायस्कूल मध्ये झाली. त्यावेळी अध्यक्ष पदावरून केळुसकर बोलत होते. या वार्षिक सभेत पुढील ५ वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी मोहन केळुसकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरचिटणीसपदी सूर्यकांत पावसकर यांच्या ऐवजी एकनाथ वासुदेव दळवी यांची निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे– उपाध्यक्ष- रमाकांत जाधव, विलास गांगण, चिटणीस- प्रकाश दिनकर तावडे, मनोहर डोंगरे, खजिनदार – चंद्रकांत गंगाराम आंर्बे, सहखजिनदार- नरेंद्र म्हात्रे सदस्य – डॉ. प्रा. सूर्यकांत आजगावकर, भाऊसाहेब परब, श्रीपत केसरकर, अनिल परब , विलास पाडावे, गणपत तथा भाई चव्हाण, सुरेश गुडेकर, सल्लागार – विजयकुमार दळवी, ॲड. राजेंद्र केळुसकर, मार्गदर्शक सूर्यकांत पावसकर
यावेळी मागिल ३ वर्षांचे हिशोब मंजूर करण्यात आले. तसेच कोरोना कालखंडात दिवंगत झालेल्या प्रा. एन. डी. पाटील, ॲड. श्रीधर राणे, मधुकर नार्वेकर, श्रीकृष्ण उर्फ भाई दत्तात्रेय प्रभू, भारती शिवगण, शिला विलास गांगण, रमेश सूर्यकांत पावसकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सूर्यकांत पावसकर, पी. एस. गुरव, भाऊसाहेब परब आदींनी कोकणच्या विकासासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार तत्वावर आधुनिक शेती, बागायती, शेतीजोड उद्योग आदींसाठी प्रवृत्त करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती बागायतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविले पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रकाश तावडे यांनी केले.


