वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या सहा महिला कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व आबोलीचे रोपटे देऊन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला येथे प्रारंभ झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे औचित्य साधून महिला कलाकारांचा सत्कार आयोजित केला होता. सत्कारांमध्ये उषा परब (सावंतवाडी), कल्पना बांदेकर (सावंतवाडी), गीताली मातोंडकर (वेंगुर्ला), वर्षा वैद्य (कुडाळ), शुभदा टिकम (मालवण), तृप्ती राऊळ (कणकवली) या महिला कलाकारांचा समावेश आहे. या सत्कारानंतर बोलताना ज्येष्ठ नाट्यकर्मी देविदास आमोणकर म्हणाले की, कुठल्याही कलाकाराकडे अभिनय कौशल्याबरोबरच सातत्यही महत्त्वाचे असते आणि सर्वात मोठा विषय येतो तो आर्थिक गणिताचा. पण आवड आणि त्यातून काढला जाणारा वेळ यातून एक चांगली भूमिका आकाराला येते. याची दखल घेत प्रोत्साहन देण्याचे काम कलावलय संस्था करीत आहे. रंगभूमीची सेवा करण्यासाठी महिलांना घरच्यांचा मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मध्यान्ह-भोजनाचा-तांदू/
यावेळी व्यासपिठावर कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, परिक्षक ज्ञानेश मुळे, रविदर्शन कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्विटी यरनाळकर आदी उपस्थित होते. सर्व सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या कार्याची दखल घेऊन सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
फोटोओळी – नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या सहा महिला कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.