वेंगुर्ला प्रतिनिधी- कुसुमाग्रज म्हणजे तेजस्वी शब्द सामर्थ्य असलेले कवी होय. त्यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा‘ या गीताने कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली. वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत. परंतु, संस्कृत भाषेमध्ये असल्याने सर्वांना वाचणे व समजणे शक्य नाही. हे ज्ञान सर्वांपर्यंत पहोचवायचे तर मराठी भाषेचे जास्तीत जास्त वाचन, लेखन झाले पाहिजे असे मत अॅड.देवदत्त परुळेकर यांनी व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कीड-आणि-रोगांच्या-व्यवस/
नगरवाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे काव्यवाचन व समुहगीत गायन कार्यक्रम घेण्यात आले. यात पाटकर हायस्कूलच्या भुषण चव्हाण, दिशा पडवळ, निर्झरा वेंगुर्लेकर, मधुरा मेस्त्री, गुड्डी कासारकर, नीताली शारबिद्रे, कृपा खोबरेकर, सानिका वेंगुर्लेकर, अपूर्वा पेडणेकर, नॅल्सी रॉड्रीक्स, रिया डिचोलकर, अनंत पवार, तेजस केळजी, निकिता कासारकर, प्रिती दास, मृदूलार बागायतकर या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन करुन समुहगीत सादर केले. तसेच संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.महेश बोवलेकर यांनी आपल्या स्वरचित कवितेचेही वाचन केले. सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी कवितावाचन म्हणजे काय? व ते कसे करावे हे समजून घेण्यासाठी टीव्हीवर काव्यवाचनाचे कार्यक्रम असतात. ते अवश्य पहावे, ऐकावेत. कवितेतील प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. कविता वाचताना ती ऐकणा-याच्या मनाला भिडली पाहिजे असे मार्गदर्शन अनिल सौदागर यांनी केले.
यावेळी संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, श्रीनिवास सौदागर, प्रा.पांडुरंग गावडे तसेच विद्यार्थी, पालक, सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार यांनी, सूत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर यांनी तर आभार राजेश शिरसाट यांनी मानले.
फोटोओळी – कविता वाचन कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अॅड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.