वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्रसिद्ध पार्सेकर दशावतार नाट्य मंडळातून सलग २५ वर्षे विविध उत्कृष्ट भुमिका करणारे वायंगणी गावचे सुपुत्र तथा ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सलोखा-योजनेचा-कोंकणा/
सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव ५ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. यावेळी श्रीसत्यनारायणाची महापूजा तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘नर्मदा मागे का फिरली?‘ हा विशेष नाट्यप्रयोग सादर झाला. यावेळी बहुसंख्य नाट्यरसिक उपस्थित होते. या नाटकाच्या प्रारंभी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळात गेले २५ वर्षे एकाच मंडळात राहून रंगभूमीची सेवा करणारे आणि आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर दशावतारी क्षेत्रात नाव मिळविलेले बाबा कामत यांना गौरविण्यात आले. वेंगुर्ला तालुका पुरवठा अधिकारी वाडेकर यांच्या हस्ते श्री.कामत यांचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वांद्रेश्वर मंडळाचे दादा सोकटे, अजित कनयाळकर, विनय गोगटे,
ज्येष्ठ दशावतारी कथा लेखक भाऊ भगत, रामेश्वर दशावतार मंडळाचे संचालक भैय्या गुरव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दशावतार आणि पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भैय्या गुरव यांनाही सन्मानीत करण्यात आले. विशेष सत्कारमूर्ती बाबा कामत यनी आपला सत्कार केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.
फोटोओळी – वांद्रेश्वर कला क्रीडा मंडळातर्फे ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा सत्कार करण्यात आला.