प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडी -बांदा परिसरात मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारी घटना घडल्यामुळे मडुरा पंचक्रोशीतील शाळांची भरण्याची वेळ व सुटण्याच्या वेळी निदान अर्धा तास पंचक्रोशीत पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी, भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनानेही दखल घ्यावी असेही ते म्हणाले.
मडुरा परिसर म्हणजे मोक्याचे ठिकाण आहे. रेल्वे टेशन तसेच मुंबई-गोवा महामार्ग तसेच गोवा जवळ असल्याने या ठिकाणी नेहमीच पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे. परंतु सद्यस्थितीत चॉकलेट देऊन मुले पळवत असल्याच्या घटना बांदा परिसरात घडल्या. त्यामुळे सकाळी १० ते १०.३० व संध्याकाळी ४.३० ते ५ वा. यावेळेत पोलिसांची गस्त असणे आवश्यकच आहे असे श्री. माधव यांनी सांगितले.
ग्रामीण भागामधील शाळेतील मुले एकमेकांच्या साथीने येतात. पालकवर्ग शेतात राबत असल्याने त्यांना अन्य सोबत नसते. त्यामुळे सदर वेळेत जर पोलिसांची गस्त मडुरा पंचक्रोशीत असल्यास अशा घटनांवर आळा नक्की देऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निदान शाळा भरणा व सुटण्याच्या वेळी तरी अर्धा तास गस्त घालावी अशी मागणी भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव यांनी केली.

