Sindhudurg: स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेचा देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान

0
38

केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेचा देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री, कौशल किशोर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय सहसचिव आणि राष्ट्रीय राष्ट्रीय मिशन संचालक रूपा मिश्रा यांच्या हस्ते प्रशासक संतोष जिरगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग देशातील एकूण ४३०० शहरांमध्ये राबविण्यात आली होती. या स्पर्धेची सुरुवात कचरामुक्त समुद्रकिनारे, डोंगर आणि पर्यटन स्थळांसाठी युवकांची रॅलीने झाली होती. या स्पर्धेचा मूळ उद्देश कचरा मुक्त शहर ही संकल्पना व्यापकतेने राबविणे, देशातील पर्यटन शहरांना अधिक सुंदर व स्वच्छ बनविणे आणि एकंदरीत शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे हा होता. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-बांदा-परिसरात-मुलांचे-अ/

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेअंतर्गत मालवण नगर परिषदेकडून कचरामुक्त समुद्रकिनारा आणि पर्यटन स्थळासाठी युवकांची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामूहिक स्वच्छता शपथ घेऊन एकाच दिवसात शहरातील एकूण ८.५ किलोमीटरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला होता, शहरातील शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस विविध सेवाभावी संस्था, पत्रकार, नागरिक, सरकारी कार्यालये सहभागी झाले होते.

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण शहराचा संघ मालवण वॉरियर्स या नावाने नोंद केला होता. नगर परिषदेने एक पर्यटन शहर असल्याकारणाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेली जनजागृती मोठ्या प्रमाणात केली होती. यात विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्था, नागरिक यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमामुळे शहर स्वच्छतेवर सकारात्मक परिणाम, शहरातील नागरिकांची स्वच्छतेविषयीची जागरूकता झाली. पत्रकारांकडून मिळालेली प्रसिद्धी व त्यामुळे झालेली जनजागृती याचा अहवालही केंद्र शासनाला सादर करण्यात आला होता. याचे परीक्षण करण्यात आले होते.

मालवण हे ऐतिहासिक व पर्यटनदृष्टया महत्वाचे व प्रसिद्ध शहर आहे. मालवण नगरपरिषदेचा केंद्र शासनाकडून झालेला हा सन्मान मालवण, तारकर्ली, देवबाग यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नव्या उंचीवर नेणारा ठरेल. मालवण शहराचा हा सन्मान मालवणवासियांच्या स्वछता विषयक सजगतेमुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे संचालक समीर उन्हाळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियानची संपूर्ण पथक, कोंकण विभाग आयुक्त, उपायुक्त, नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, व्यापारी, मत्स्य व्यावसायिक-मासेमार, सेवासंस्था यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, शहर वासीयांचा सहभाग, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे मालवण शहर या बक्षिसास पात्र ठरले असे मत नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री जिरगे यांनी व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्याच्या-संपूर्ण-भ/

केंद्र शासनाकडून झालेल्या या सन्मानामूळे जबाबदारी अजून वाढलेली आहे व या वर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सुद्धा मालवण वासीयांच्या सहकार्याने शहराला चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू व या प्रयत्नात कचरा मुक्त शहर करण्यासाठी, कचरा विरुद्ध लढण्यासाठी सर्व मालवणवासीयांनीही तयार राहावे व मालवण शहराला एक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर नावारूपास येण्यास सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here