राजापूर- शासनाने प्रत्येक विभागात एकच मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा निर्णय घेतला आहे. कोकण विभागाचे रूग्णालय ठाणे जिल्ह्यात मंजूर करण्यात आल्याने राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे प्रस्तावित रूग्णालयाला शासनाने ठेंगा दाखवला आहे. राजापूर तालुक्यात आरोग्याचे तीन तेरा वाजलेले असताना शासनाने राजापूर तालुक्यात प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाकडे दुर्लक्ष करून कोकणावर पुन्हा एकदा अन्याय केल्याचे मत व्यक्त होत आहे.
या रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत वाटूळ येथील जमीन आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. याकामी आमदार राजन साळवी यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र शासनाकडून याला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. शासनाच्या या निर्णयाबद्दल राजापूर तालुक्यात नाराजी व्यक्त करण्यात येत असून या रुग्णालयासाठी रस्ता रोकोसारखे आंदोलन छेडण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.


