मुंबई: शिवसेनेचे फायरबॅण्ड नेते खासदार संजय राऊत यांना १०२ दिवसांनी जामीन मंजूर झाला. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर थेट त्यांनी सिद्धिविनायक मंदिर येथे भेट दिली. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी सोबत शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, संदेश पारकर, संजय पडते, संग्राम प्रभुगावकर, मंदार केणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत यांच्या विरोधात केलेला अपील कोर्टाने फोटाळून लावला. त्यामुळे संजय राऊत यांची बुधवारी सायंकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचे तुरुंगाबाहेर जोरदार स्वागत केलं. फटाक्यांची आतषवाजी देखील केली.’वाघ परतला’, असे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, की उद्धव ठाकरे गटात संजय राऊत सारखे नेते आहे, तोपर्यंत कोणाचीही भीती नाही.
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत हॉस्पिटलमध्ये दाखल होणार असल्याची माहिती विक्रोळीचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांनी दिली आहे. जनतेचा आशीर्वाद सदैव संजय राऊत यांच्या पाठिशी आहे. संजय राऊत लवकरच राजकारणात संक्रीय होतील, विधानसभेवर भगवा फडकेल, असेही आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.