दापोली- सध्या आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. शिक्षक पर्व या उपक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षकांनी नाविन्यपूर्ण व आधुनिक अध्यापनशास्राचा अवलंब आपल्या दैनंदिन अध्यापनात करायला हवा असाच आहे. शिक्षकांनी दैनिक अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज नव्याने येणारे तंत्रज्ञान आत्मसात करावे असे स्पष्ट प्रतिपादन दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी जोगेळे नं. १ येथील आयोजित शिक्षण परिषदेत बोलताना केले.
दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच दापोली येथील जि. प. शाळा जोगेळे नं.१ येथे आयोजित करण्यात आली होती. गिम्हवणे शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मुग्धा सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील या शिक्षण परिषदेच्या व्यासपीठावर गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रविण काटकर, गिम्हवणे केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सदाशिव रसाळ, चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रीमा कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेत विविध शासकीय उपक्रम, योजना, प्रशासकीय माहिती व मार्गदर्शनासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ‘ शिक्षक पर्व ‘ उपक्रमांतर्गत मौजे दापोली शाळेतील शिक्षक महेश कोकरे यांनी ‘ डेमो लेसन ‘ घेऊन शिक्षक पर्व या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषेतील सूचना व आदेश या विषयावर गिम्हवणे शाळेतील विषय शिक्षिका प्रिया पवार यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख प्रविण काटकर यांनी सर्व आवश्यक प्रशासकीय बाबी व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले व उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या शिक्षण परिषदेसाठी गिम्हवणे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन संभाजी सावंत यांनी तर दत्ता गिलबिले यांनी सर्व उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे आभार मानले.