वेंगुर्ला प्रतिनिधी-विद्यार्थी आणि पालक यांना घडविणारी एक अभिनव प्रयोगशाळा म्हणजे ‘मुक्तांगण.‘ या प्रयोगशाळेतील आम्ही पालक एक संशोधक आहोत. मुलांबरोबर घडत, वाढत जाण्याची प्रक्रिया काय असते हे आम्ही अनुभवले असून त्यातून आम्ही समृद्ध होत गेलो. एक सुजाण पालक म्हणून मुलांच्या विकासाच्यादृष्टीने काय विचार केला पाहिजे याचे मार्गदर्शन मुक्तांगणच्या पालक शाळेत घेतो असे मत दिव्या आजगांवकर यांनी ‘आईपण निभावताना‘ या परिसंवादामध्ये काढले.
मुक्तांगण महिला मंच व बालविकास प्रकल्प यांच्यातर्फे बालदिनाचे औचित्य साधून महिला मंचच्या अध्यक्षा संजना तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आईपण निभावताना‘ हा परिसंवाद आयोजित केला होता. श्रद्धा बोवलेकर यांनी मुलांमध्ये होत जाणारे बदल, कोरोना काळाचा दुष्परिणाम आणि जबाबदार पालकांची भूमिका निभावताना होणारी दमछाक यावर आपले विचार मांडले. काहीसे कठोर वाटणारे पालक शाळेतील मार्गदर्शन हे दोन्ही मुलांच्या वाढीवर टप्प्याटप्प्याने कसे परिणाम करतात याबाबत साक्षी वेंगुर्लेकर यांनी माहिती दिली.
आपली मुले ही आपल्याला आयुष्याने दिलेली एक सुंदर, अपूर्व अशी भेट आहे. त्यांच्यामुळेच आपल्या जगण्याला एक नवा अर्थ आला आहे. त्यांना आपण निट उमलू देऊया असे आवाहन मुक्तांगणच्या संचालिक मंगल परुळेकर यांनी केले. या परिसंवादानंतर पालकांनीही बालदिनाची धम्माल खेळ, गाणी, गोष्टीतून मज्जा घेतली.
कार्यक्रमाचे नियोजन मुक्तांगणच्या सहाय्यक शिक्षिका गौरी माईणकर यांनी केले. तर महिला मंचातर्फे स्वाती बांदेकर, संजना तेंडोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटोओळी – मुक्तांगणतर्फे आयोजित केलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले.

