वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘शिकण्यातील मजा आणि मजेतून शिक्षण घडावे‘ असा आग्रह धरुन मुक्तांगणच्या बालशिक्षणाचा अभिनव प्रकल्प असलेला ‘मुक्तांगण स्नेहमेळावा २०२३‘ हा २ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला.
विद्यार्थीप्रिय शिक्षक भरत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात वरदा परब हिच्या गणेशवंदनाने झाली. विविध विषयांत प्राविण्य मिळविलेल्या मुलांना भरत गावडे, अॅड.देवदत्त परुळेकर, कैवल्य पवार, प्रा.महेश बोवलेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुक्तांगण महिला मंचची पदाधिकारी संजना तेंडोलकर हिने नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या ‘शिवगर्जना‘ या नाटकात आपली कला सादर केल्याबद्दल तिचा तसेच मुक्तांगणच्या सहशिक्षिका गौरी माईणकर, निला करंगुटकर, प्रिती राऊत यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभिषेक वेंगुर्लेकर व अॅड.श्रीकृष्ण ओगले यांनीही मुक्तांगण हे व्यक्तिमत्व विकासाचे खरेखुरे अंगण आहे. येथे सामाजिक मुल्यांची रुजवण योग्यप्रकारे होण्यावर तसेच शैक्षणिक ज्ञानापलिकडे जीवनशिक्षण आनंददायी कसे होईल यावरही जास्त भर दिला जात असल्याबाबत गौरवोद्गार काढले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-काँग्रेस-ओब/
लहान मुलांनी विविध बालगीतांवर नृत्ये केली. भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यावर आधारीत मुलांना हे विषय सहज आणि सोप्या पद्धतीने कसे शिकवावेत याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात एकही पाल्यांच्या वयाला न शोभणारी अर्थहीन, संदर्भरहित गीते नव्हती. सुजाण पालक केंद्रातर्फे माता पालकांनी ‘हिच आमुची प्रार्थना‘ हे गीत तसेच मुक्तांगण महिला मंच व सुजा पालक केंद्रातर्फे आई मुलांच्या नात्यावर विशेष भावनिक नृत्य सादर केले. विस्मरणात गेलेले पाटी, पेन्सिल, स्पंज हरवले आहेत. याबाबत प्रितम ओगले लिखित छोटे नाटक भागर्व ओगले, माधव ओगले व विनायक ओगले यांनी सादर करीत वाहवा मिळविली. शुभ्रा अंधारी हिचा पोवाडाही लक्षवेधी ठरला. निल पवार याने अभंग, चिन्मय मराठे याने रॅपसाँग, वेद वेंगुर्लेकर व हंसिका वजराटकर यांनी कोळीनृत्यातून आपली कला सर्वांसमोर आणली.
महिला मंचच्या साक्षी वेंगुर्लेकर, स्वाती बांदेकर, दिव्या आजगांवकर, संजना तेंडोलकर, मंजिरी केळजी, रुपा शिरसाट, माहेश्वरी गवंडे, रिया केरकर, निलम रेडकर आणि संध्या करंगुटकर यांनी उत्कृष्ट असे टाळ नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी संगितसाथ शाम नाडकर्णी व सुशांत नरसुले यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरी माईणकर, गणेश माईणकर, निला करंगुटकर, प्रिती राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. सानेगुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म‘ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध संस्थांनी शुभेच्छा पाठवल्या. तर सीमा मराठे, साक्षी बोवलेकर, डॉ.स्वप्नाली पवार, लता वेंगुर्लेकर, माजी पालक व वेंगुर्ल्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुक्तांगणला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर व नृत्य दिग्दर्शक रिया केरकर यांनी तर दिव्या आजगांवकर यांनी आभार मानले.
फोटोओळी – मुक्तांगणच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.