वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ले: तालुक्यातील निवती समुद्रामध्ये नांगरून ठेवलेल्या मच्छिमार व्यावसायिक श्याम चंद्रकांत सारंग यांच्या मालकीच्या चांदणी या मिनी पर्सनेट बोटीला अज्ञातांनी १ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर किनाऱ्यापासून दूर समुद्रामध्ये आग लावली. या बोटीवर असलेल्या ३ इंजिन व जाळ्यांनी पेट घेतल्याने समुद्रातच आगीचा भडका उडाला. दरम्यान या आगीत ३ इंजिन, जाळी, टीव्ही, कॅमेरा, फिश फाईंडर व लाईट सिस्टीम बोटीसह जाळून सुमारे ४५ लाखांच मोठे नुकसान झाले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-हापूस-ची-मार्/
बुधवारी रात्री खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना समुद्रात बोटीला आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी मोबाईल वरून किनारपट्टीवर घटनेची माहिती दिली. यावेळी तात्काळ याठिकाणचे स्थानिक मच्छिमार जमा झाले व अन्य बोटींच्या साहाय्याने मच्छिमार समुद्रात गेले असता श्याम सारंग यांच्या मालकीची बोट जळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान ही बोट वारा असल्याने ७ ते ८ वाव समुद्रात गेली होती. यावेळी मच्छिमारांनी या आगीवर पाणी मारून आग विझवली मात्र तोपर्यंत बोटीचा जास्तीत जास्त भाग व आतमधील जाळी, इंजिन व इतर सहित जळून खाक झाले होते. यानंतर बोट इतर बोटींच्या साहाय्याने किना-यावर आणण्यात आली.
या घडलेल्या घटनेमुळे निवती श्रीरामवाडी भागत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान निवती ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आग रात्री १ वाजून ८ मिनिटांनी लावल्याचे दिसून आले आहे. मात्र कोणीही संशयित काळोखामुळे कॅमेरामध्ये कैद झाले नसल्याची माहिती निवती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनास्थळी निवती पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे