मुंबई, दि. २२ : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत महानगर पालिका शाळा, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी नाका, वरळी येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-डॉक्टर-तंत्रज्/आरोग्य/
यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महारोजगार मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार, एअरटेल इ. कंपन्या सहभागी होणार असून दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक व इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एच आर, अॅप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ॲण्ड एन्टरटेंमेंट अशा प्रकारे विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध असणार आहेत.
या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलबध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती देणारी दालने असतील. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही यामध्ये समावेश असेल.
मुंबई शहर येथील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.