अमेरिकेने हरिकेन मेलिसा या चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या जमैका, हैती, बहामाज आणि क्यूबा या कॅरिबियन देशांसाठी २४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आपत्कालीन मदत जाहीर केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या देशांमध्ये आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि तज्ञ संघ पाठवण्यात आले असून, परिस्थितीचे मूल्यमापन आणि मानवतावादी गरजा ओळखण्यासाठी कार्य सुरू आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या या पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळामुळे प्रचंड हानी झाली असून, संपर्कव्यवस्था खंडित झाल्या आणि ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
या मदत पॅकेजअंतर्गत जमैकाला १२ दशलक्ष डॉलर्स, हैतीला ८.५ दशलक्ष डॉलर्स, आणि बहामाजला ५ लाख डॉलर्स दिले जाणार आहेत. तर क्यूबाला ३ दशलक्ष डॉलर्सची मदत दिली जाणार असून, ती कॅथोलिक चर्चच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, “आमच्या पथकांनी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला आहे. विशेषतः जमैका आणि हैतीसाठी, पुढील काही दिवसांत अधिक मदत जाहीर केली जाईल.”
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी क्यूबासाठी मानवतावादी मदतीची घोषणा केल्यानंतर या देशाला मदत सुरू करण्यात आली आहे. अमेरिकन प्रशासनाने क्यूबाशी आर्थिक नाकेबंदी आणि पर्यटनबंदी कायम ठेवली असली, तरीही ही मदत थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
क्यूबा सरकारने अधिकृतरीत्या मदत मागितली नसली तरी, अमेरिकेने मदतीचा निर्णय कायम ठेवला आहे. “क्यूबन प्रशासन काहीही म्हणो, आम्ही क्यूबन जनतेची काळजी घेतो आणि आतापर्यंत सरकारने मदतीत अडथळा आणलेला नाही, हे समाधानकारक आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हरिकेन मेलिसा हे या प्रदेशावर आलेले सर्वात मोठे नैसर्गिक संकट मानले जात आहे. यावर्षीच्या सुरुवातीला अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने USAID (यू.एस. एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) ही संस्था विसर्जित केल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली होती.
या अंतर्गत, परराष्ट्र मंत्रालयाने ‘डिसास्टर असिस्टन्स रिस्पॉन्स टीम्स’ (Disaster Assistance Response Teams) विविध देशांमध्ये तैनात केल्या असून, अर्बन सर्च अँड रेस्क्यू पथकांना जमैकामध्ये पाठवण्यात आले आहे, जे मदतकार्याचे समन्वय साधत आहेत.


