आर्थिक लोकशाही म्हणजे संधींची समानता – डॉ. अजित रानडे
मुंबई | प्रतिनिधी
लोकशाही म्हणजे केवळ राज्यव्यवस्था नव्हे, तर जीवन जगण्याची एक पद्धत असून आर्थिक लोकशाही म्हणजे संधींची समानता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘विचारवेध’ व्याख्यानमालेतील ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
हे पण वाचा ठाण्यात दिव्यांग कायदा कार्यशाळा
डॉ. रानडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथासह त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. शिक्षण, जमीन सुधारणा, कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा यासारख्या क्षेत्रांतील बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच सुसंगत असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांतून मांडले.
“बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा नायगरा धबधबा,” असे सांगत डॉ. रानडे यांनी त्यांच्या विचारांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. स्वतःच्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, हे बाबासाहेबांचे तत्त्व प्रत्येकाने अंगीकारावे, असे ते म्हणाले.
समता, स्वातंत्र्य, बंधुता या लोकशाही मूल्यांबरोबरच कोणीही कनिष्ठ नाही ही भावना जपणं महत्त्वाचं आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. आर्थिक विषमता पूर्णपणे नाहीशी होणार नसली तरी ती किमान पातळीवर ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिक हा देशाचा प्रमुख घटक असल्याने बाबासाहेबांनी नागरिककेंद्रित संविधान दिले, असे सांगत संवैधानिक नैतिकतेचे पालन प्रत्येकाने करावे, असेही त्यांनी नमूद केले.

कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, स्त्रियांना समान सामाजिक व आर्थिक संधी मिळाव्यात, सर्वांना समान अधिकार मिळावेत, तसेच संपत्तीच्या एकवटीकरणावर नियंत्रण असावे — असा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत डॉ. रानडे यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडून दाखवला.
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, स्मारकाच्या सल्लागार संध्या अंबादे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त डॉ. शिंदे यांनी मनोगतात समाजाला विचारच प्रगतीकडे नेतात, असे सांगत ‘विचारवेध’ व्याख्यान मालिकेद्वारे समाजात विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. स्मारक परिसरातील ग्रंथालय, विविध उपक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ पदविका अभ्यासक्रमातून समाजप्रबोधन आणि समाज उन्नती साधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाला रसिकांची भरगच्च उपस्थिती लाभली.

