एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार

0
83
पुणे,दि.१३: विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होईल तसेच ती विद्यार्थ्यांसाठीही महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

कल्याणीनगर येथे युनीसेफच्या सहकार्याने ‘राज्यातील एनएसएस प्रमुखांच्या सामाजिक विकासाबाबत प्रबोधन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबल, एनएसएसचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, एनएसएसचे विभागीय संचालक डॉ. डी. कार्तिकेयन, युनिसेफचे प्रकल्प प्रमुख तानाजी पाटील, एनएसएसचे सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, राज्यात सामाजिक सेवेची चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा असे काम एनएसएसचे स्वयंसेवक करीत आहेत. कोरोना काळात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कोरोना कालावधीत युनीसेफसारख्या संस्था पुढे येतात आणि त्यातून चांगले काम उभे राहते. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कोरोना कालावधीत केलेले कार्य कायम स्मरणात राहणारे आहे, त्यामुळे एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि देशभक्तीसाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन करून श्री. सामंत म्हणाले, विद्यार्थी राज्याच्या भविष्यातील शैक्षणिक व्यवस्था सदृढ करणारे कार्यकर्ते आहेत. राज्याला शैक्षणिकदृष्टया पुढे घेवून जाण्यासाठी एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य राहील असे ते म्हणाले. बालविवाहासारख्या विषयांवर चिंतन होण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.युनिसेफचे श्री. पाटील यांनी प्रास्ताविक करताना युनीसेफच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. या दोन दिवसीय कार्यशाळेत बालविकास, पर्यावरणीय बदल, मुलांचा सर्वांगिण विकास, आरोग्य सेवा, कोरोना दक्षता तसेच सामाजिक विकासाबाबत प्रबोधनाबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राज्यातील एनएसएसचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here