केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसीत करणे गरजेचे -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
129

सिंधुदुर्ग– ‘प्रेरणा’ उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून पहिल्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आज आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसीत करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

पूर्व परीक्षेसाठी विषयाची निवड करताना आपल्या आवडीच्या विषयाची निवड करावी असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, या परीक्षांना सामोरे जाताना विषयाची निवड, अभ्यासक्रम, पुस्तकांची निवड याच बरोबर मुलाखतीची तयारी ही महत्वाची असते. अनेक पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा एकाच पुस्तकाचा वारंवार अभ्यास करणे जास्त फायद्याचे ठरते. कोचिंग क्लासेसचा फायदा होतो. त्यामुळे अभ्यासाची वातावरण निर्मिती होत असते. अभ्यास करत असताना त्याचे वेळापत्रक तयार करणेही तितकेच महत्वाचे आहे. पेपर सोडवत असतानाही वेळेचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी पूर्व तयारी आवश्यक आहे. पेपर सोडवण्याचा सराव करावा. लिखाणही तितकेच महत्वाचे आहे. मॉक टेस्ट नियमितपणे कराव्यात. यासर्व तयारीसोबतच मनोबल राखण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. तुम्हाला जर संगीत आवडत असेल तर दिवसातील काही वेळ ते ऐका, त्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला मदतच होणार आहे. फक्त अभ्यास करणे, इतर गोष्टी न करणे असे करू नका, नियमितपणे वर्तमानपत्रे वाचावीत, त्यातून नोट्स काढाव्यात, प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सीच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर म्हणाले, मुलाखत हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्याची तयारी करण्यासाठी मॉक इंटरव्ह्युव महत्वाचा आहे. विषयांची निवड आवडीने करावी. प्रत्येक विषयावर बाजारामध्ये अनेक पुस्तके आहेत. सर्व उपयुक्त आहेत म्हणून सर्व वाचण्याऐवजी समग्र पुस्तक निवडावे. मुलाखतीच्या वेळी कोणताही ताण घेऊ नये.

सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा म्हणाल्या, आताच्या काळात इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. पुस्तके, अभ्यासक्रम याची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचाही अभ्यास करावा. यावेळी विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, विषयांची निवड, अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत, तंत्र यासह विविध विषयांची तयारी करण्यासाठी करावयाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात प्रेरणा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे पहिलेच सत्र आयोजित करण्यात आले होते. पुढील सत्रांमध्ये भाषा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here