हवामान खात्याने दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पावसाची शक्यता वर्तविली होती. तेलंगणसह आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, के रळ, तमिळनाडू या राज्यांत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही २५ एप्रिलपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात २८, २९ आणि ३० एप्रिल आणि रायगड जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८, २९ आणि ३० एप्रिल या दोन दिवसांत वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात आणि विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८, २९ आणि ३० एप्रिल या दोन्ही दिवशी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.
वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस पडत आहे. पुण्यामध्येही काल दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरातही सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.