मुंबई, दि.१२ :- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.कृषि मंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांनी निदर्शनास आणून दिले होते. याबाबत कृषि मंत्री यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील, यांच्याशी संवांद साधून निदर्शनास आणून दिले.
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पणन मंत्री यांच्या सुचनेनूसार कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांनी दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी परिपत्रक जारी केले आहे.याबाबतची दक्षता घेण्यात यावी व अशाप्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ नियम १९६७ व त्याखालील उपविधीतील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.