कोराडी,खापरखेडा वीज केंद्रामध्ये ऑक्सिजन प्लांट व कोविड सेंटरची शक्यता तपासा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
110

नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक प्रचंड वाढला असून दररोज मृत्यू संख्येचा आकडा वाढत आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय हॉस्पिटल, तसेच कोविड केअर सेंटरमध्ये बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे.आणीबाणीच्या परिस्थितीत खापरखेडा व कोराडी येथील ओझोन प्लांट मधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करताना ही बाब शक्य आहे का..? व त्याबाजूलाच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बेडची व्यवस्था करता येईल का याची तातडीने चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना दिले आहेत.

या संदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय बाजू तपासण्यासाठी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्वतः दोन्ही वीज केंद्रांना भेट दिली. वीज केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांसाठी ओझन प्लँटची आवश्यकता असते. या ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनची उपलब्धता शक्य आहे. सोबतच वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात शहरात रुग्ण संख्येचा स्फोट झाल्यास ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या ठिकाणा जवळच अर्थात या दोन्ही केंद्रांमध्ये तात्पुरती कोविड केंद्र उभारली जाऊ शकतात काय याबद्दलची देखील चाचपणी करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोराडी वीज निर्मिती केंद्रात 390 क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत आहे तर खापरखेडा येथे 50 क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता या ठिकाणी शक्यता असून उद्या सकाळी जिल्हा प्रशासन या संदर्भात आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here