तौकते वादळात वेंगुर्ला रॉक लाईट होऊसमध्ये दोन कामगार अडकले होते.त्यांना तेथून वादळी हवामानामुळे बाहेर पडणे अशक्यच होते.या दोन्ही कामगारांना ३ दिवस अन्न पाण्याशिवाय काढावे लागले. त्यांना मंगळवारी इंडियन कोस्टल गार्डने सोडविण्यात यश मिळवले. लाईटहॉउस आणि लाईटशिप कडून त्यांचे दोन कामगार वेंगुर्ला रॉक लाईटहाऊस वर अडकले आहेत असा संदेश इंडिया कोस्टल गार्डला मिळाला आणि मदत मागितली.
तौकते वादळानंतर अतिशय खराब हवामान असूनही दाबोलीम विमानतळावरून चेतक हेलिकॉप्टरने गार्डस या दोन्ही कामगारांना सोडविण्यासाठी निघाले. त्यावेळी तौकते वादळाचे अत्यंत तीव्र वेगाचे वारेही वहात होते.
कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर गोव्यातून मंगळवारी सकाळी ११ वाजता निघाले आणि अवघ्या २५ मिनिटात वेंगुर्ला रॉक वर पोहोचले .परंतु हा संपूर्ण भाग खडकाळ असून हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टर हवेतच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अडकलेल्या दोन्ही कामगारांना दोराच्या साहाय्याने दाबोलीम येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आणि त्यांना लाईट हाऊसच्या ताब्यात सहीसलामत देण्यात आले.
त्याआधी एक दिवस कोस्टल गार्डने तौकते वादळात ‘मिलन’ नावाच्या भरकटलेल्या व इंजिन खराब झालेल्या बोटीला आणि त्यावरील १५ खलाशांना रेडीच्या किनारी सुरक्षित पोहोचवले होते.