सिंधुदुर्गनगरी, दि. 30 – जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी माझी आगदी घरच्यासारखी काळजी घेतली. आम्हाला उत्तम असे जेवण दिले जात होते. वेळेवर औषध देण्यासाठी नर्स तत्पर होत्या. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मालवण तालुक्यातील वायरी येथील 61 वर्षीय रुग्णाने. सदर रुग्णास आज उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
मालवण तालुक्यातील वायरी येथील 61 वर्षीय व्यक्ती 20 दिवसांपूर्वी कोरोना पॉजिटिव्ह आले. त्यानंतर त्यांची एचआरसीटीही करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा स्कोअर 17 इतका होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व स्टाफने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करुन घेतले. 20 दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी नेण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा म्हणाला, कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर आम्ही खूपच घाबरलो होतो. काय करावे ते सूचत नव्हते. पण, रुग्णालयातील स्टाफने चांगले सहकार्य केले. त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी वाहनाची सोय केली. तातडीने दाखल करून घेतले. या काळात लागेलते सर्व सहकार्य केले. योग्य उपचार करुन त्यांना आज घरी सोडत आहेत.
आम्हाला झालेला आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. नातेवाईकांच्या डोळ्यातील या आनंदाश्रूतूनच जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी करत असलेल्या रुग्णसेवेची पोच पावती मिळाली असेच म्हणावे लागेल