‘तौत्के’ चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे मुंबईत पालिकेकडून सतर्कतेचे आदेश

0
98

वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे अरबी समुद्रात तौत्के नावाचं चक्रीवादळही तयार होत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्यामुळे या वादळाचा तडाखा मुंबईलाही बसणार आहे. १५ ते १६ मे रोजी मुंबईजवळ येण्याची शक्यता आहे. यामुळे वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी खालील उपाययोजना केल्या आहेत.

1, जंबो कोविड सेंटरसह इतर परिसरातील धोकादायक 384 वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे.2.समुद्र किनारी असणाऱ्या ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, त्या वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे3. 24 विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.4. पाणी तुंबण्याच्या ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.5.पूर बचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत.6. नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाद्वारे करण्यात येत आहे. 7.जंबो कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांसह 395 रुग्णांचे स्थानांतरण हे महापालिकेच्या व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे.8.वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांनी रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here