दिल्लीतील इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योत’ राष्ट्रीय युद्ध स्मारकातील शाश्वत तेवणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन

0
78

दिल्ली: दिल्लीतील इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योत’ शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकातील शाश्वत तेवणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. अमर जवान ज्योती मशालीसह संपूर्ण लष्करी सन्मानासह युद्ध स्मारकावर नेण्यात आले. दिल्लीतील 50 वर्षांपासून इंडिया गेटची ओळख बनलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन झाली.कात्मिक संरक्षण दलांचे प्रमुख एअर मार्शल बी. आर. कृष्णा हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन करण्यात आल्याने नागरिक तेथे आदरांजली अर्पण करू शकतात, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले होते. तेथे २५,९४२ जवानांची नावे सुवर्णाक्षरात कोरण्यात आलेली आहेत.

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत स्वातंत्र्यानंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता आणि आदरांजलीचे प्रतीक होती. अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर तोफ डागली. सरकारने अमर जवान ज्योत विझवून इतिहास पुसून टाकला, असा आरोप काँग्रेसने केला. काही लोक देशभक्ती आणि जवानांचे बलिदान समजू शकत नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस पुन्हा एकदा अमर जवान ज्योत प्रज्ज्वलित करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. वाद उद््भवण्याची चिन्हे आहेत. काही माजी लष्करी सेनाधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माजी लष्करप्रमुख जनरल वेद मलिक यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले, तर माजी हवाई दल उपप्रमुख मनमोहन बहादूर यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटर संदेशाद्वारे हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

भारताने १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर, ‘अमर जवान ज्योत’ हे भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मारक म्हणून उभारले गेले होते. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते.अमर जवान ज्योत हे १९७१ आणि इतर युद्धांतील शहिदांच्या आदरांजलीचे प्रतीक आहे, परंतु त्यांची नावे तेथे कोरलेली नसणे ही विचित्र गोष्ट आहे. इंडिया गेटवर कोरलेली नावे केवळ अशा काही जवानांची आहेत ज्यांनी पहिले महायुद्ध आणि अँग्लो अफगाण युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने बलिदान केले. त्यामुळे ते देशावरील वसाहतवादी भूतकाळाचे प्रतीक आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here