राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या पदांचा भार इतर व्यक्तींवर सोपवण्यात आला आहे असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राज्याच्या अल्पसंख्याकमंत्रीपदी ते कायम राहतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची चर्चा झाली.या बैठकीनंतर नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या पदांचा भार इतर व्यक्तींवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवाब मलिकांचे पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यांपैकी परभणीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याबद्दलची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असून त्यावर शिक्कामोर्तब होईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवण्यात आले आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यानंतर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची अटक चुकीच्या पद्धतीने झाली असून त्यांचे कुटुंबीय या विरोधात लढत आहेत असे जयंत पाटील म्हणाले