देशभरातील करोनाबाधित महाराष्ट्रासहीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण देशात आढळून आले आहेत. मात्र आरटीपीसीआर तसेच अँटिजेन चाचणी (प्रतिजन चाचणी) करण्याचं प्रमाण वाढल्याने तपासणी केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. आरटीपीसी आर चाचण्यांचा निकाल मिळण्यासाठी ७२ तासांहून अधिक वेळ लागत आहे.
पुण्यामध्ये मात्र शनिवारपासून अवघ्या चार तासांमध्ये आरटीपीसीआर चाचणीचे निकाल मिळणारी एक अनोखी चालती फिरती प्रयोग शाळा सुरु होणार असल्याची माहिती कोथरुडचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.पुणे शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरणार आहे.
काही ठिकाणी चाचण्या करण्यासाठी लोकं घाबरत आहेत. अशा परिसरांमध्ये जाऊन माईकवरुन या प्रयोगशाळेसंदर्भात माहिती दिली जाईल आणि तेथील नागरिकांच्या चाचण्या केल्या जातील, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे