” बहुजन हिताय ,बहुजन सुखाय ”
या पंक्तीप्रमाणे मला बहुजन समाजाला बरोबर घेऊन त्याला सुधारण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याच्या ध्येयाने मी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर माझ्या दैनिकाची ” सिंधुदुर्ग समाचार ” ची सुरुवात करतो आहे. बहुजन समाजाला बरोबर घेऊन गावागावातील अडचणींवर मात करून ग्रामीण विकास करण्याची ताकद या दैनिकाने मला मिळावी अशी अपेक्षा आणि ध्येयवाद समोर ठेऊन हे दैनिक मी सुरु करत आहे.
माझा जन्म देवगडजवळील अतिशय दुर्गम भागातील गढीताम्हाणे या गावाचा. माझे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मी पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेलो.माझ्या गावातील मी एकटाच विद्यार्थी त्यावर्षी सातवी इयत्ता पास झालो होतो. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर कायद्याची पदवी घेतली.पण शिक्षण क्षेत्रातच काम करून नवीन येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या आयुष्याला एक विशिष्ट दिशा देण्याचे काम करावे या हेतूने मी शिक्षणक्षेत्रातच काम करण्याचे ठरविले. शिक्षणक्षेत्र निवडले त्याचे कारण बहुजन समाजाला जागे करण्याचे धेय्य मी स्वीकारले होते आणि या धेय्याने मी पूर्णपणे वेडावलेलो होतो. वृत्तपत्र सुरु करून समाजप्रबोधन करणे हाही या वेडाचाच एक भाग होता.
खरे म्हणजे स्वातंत्र्यानंतर समाजाला योग्य राजकीय दिशा देणाऱ्या समाजमाध्यमांचा खरी गरज होती परंतु स्वातंत्र्याच्या काळातील ती पिढी वृद्ध झाली होती आणि त्यानंतरच्या पिढीने आर्थिक अडचणीमुळे ते कार्य करण्याचे धाडस केले नाही. नवी बहुजन पिढी राजकारणाकडे आकर्षित झाली.बहुजन समाजाच्या राजकीय नेतृत्वानेही या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.त्याचा परिणाम हा बहुजन समाजाचे प्रबोधनाचे काम थांबण्यात झाला. शाळा महाविद्यालयात शिकून तयार झालेली बहुजन समाजाची नवीन पिढी नोकरी धंद्याला लागली.बहुजन समाजाचे प्रबोधन करायला कुणालाच वेळ नव्हता.मी हे सर्व पहात होतो मला लोकांना बहुजन समाजाला खरे वास्तव सांगायला हवे आहे असे सतत वाटत होते, त्यासाठी वृत्तपत्राची गरज आहे आणि आपण ते सुरु करायला हवे आहे असेही सतत वाटत होते म्हणूनच मी हे वृत्तपत्र सुरु करीत आहे.
महाराष्ट्रात जिल्हास्तरावरही वृत्तपत्रे आहेत.परंतु या स्थानिक स्वरूपाच्या वृत्तपत्रांचा दृष्टिकोनही समाज प्रबोधनाचा नाही.याला काही वृत्तपत्रे अपवादही आहेत.राज्यातील नेतृत्वाची प्रामाणिक धडपड,आणि सर्वस्व पणाला लावून कष्टकरी समाजाच्या उद्धारासाठी केलेले काम लोकांसमोर यावे तसेच या ग्रामीण जनतेच्या शिकलेल्या पिढीसमोर चुकीचे चित्र उभे राहत आहे हे वास्तव मी पाहत होतो. मात्र लोकांना – बहुजन समाजाला खरे वास्तव सांगायला हवे आहे असे सतत वाटत होते.त्यासाठी वृत्तपत्राची गरज आहे आणि आपण ते सुरु करायला हवे या जाणिवेतूनच या दैनिक सिंधुदुर्ग समाचारचा जन्म आज होत आहे.
एका अर्थाने अनेक वर्षांपासून मी पाहिलेले माझे स्वप्न सत्यात उतरत आहे. बहुजन समाजाकडून मला यासाठी साथ मिळावी अशी अपेक्षा आहे. दैनिक सिंधुदुर्ग समाचारची झेप आता कशी होईल हे येणारा काळच ठरवेल.
प्राचार्य मुकुंदराव कदम
एम.ए. एल.एल.बी