मिरारोड-सौ.स्मिता धुरी.
“अमेरिकेत पंचवीशीतील ४२% तरुणांमध्ये मानसिक आजार, भविष्याबद्दल चिंता, वैफल्य” अशी एक बातमी नुकतीच वाचनात आली. ‘हार्मनी हेल्थकेअर’ Harmony Healthcare llc आयटीच्या एका पाहणीतील निष्कर्षातून हे स्पष्ट झाले. तेथे प्रत्येक पाचव्या तरुणास डॉक्टरांची गरज असून निम्म्यांना औषधीची गरज पडते. प्रत्येकी १० पैकी ८ वैफल्यग्रस्त, ९ जणांमध्ये चिडचिड वाढली आहे. तसेच ९५% तरुणांना भविष्याबद्दल, वैयक्तिक आर्थिक स्थिती, अर्थव्यवस्था, पर्यावरण, देशातील राजकीय ध्रुवीकरण याबाबत चिंता वाटते. इतर वयस्कर गटाच्या तुलनेत पंचविशीतील तरुण भावनात्मक पातळीवर दुप्पट त्रासातून वाटचाल करत आहेत.
भारत ही एक अध्यात्मिक भूमी आहे. ‘भारतीय परंपरा आणि संस्कृती’ तसेच ‘सामाजिक मूल्य आणि संस्कार’ यांचा आपल्या जीवनावर गुरुकुल पद्धतीतील शिक्षणाने बऱ्यापैकी पगडा होता. संत चारित्र्य, संत साहित्य व्यक्तीच्या जीवनाला आकार देते. कठीणातील कठीण प्रसंगांना सामोरे कसे जायचे ते शिकवते. प्रत्येक संकटावर भक्तीच्या जोरावर मात कशी करायची याचे धडे आपल्याला शिकायला मिळाले.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वत्र अनिश्चित वातावरण असताना संत साहित्य, मोठमोठ्या शूर चारित्र्यवानांची, क्रांतीकारकांची चरित्र यातून फार मोठा आधार मिळू शकतो. अशा साहित्याच्या अभ्यासाची सोय उपलब्ध करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दुर्दैवाने सध्याच्या शिक्षण पद्धतीतून नीती मूल्यांवरील शिक्षण, संस्कार हा भागच नाहीसा झाला आहे. आज उपजीविकेसाठी व्यक्तीला योग्य बनवण्याच्या प्रक्रियेला शिक्षण म्हटले जाते. ते आपणाला फक्त रोजगार देऊ शकते. जसजसे हे रोजगार देणारे शिक्षण वाढत जाते तसतशी नैतिकता घटक चालली आहे
समाजातील वाढता भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे,चोऱ्या,अपहरण, क्रोधाने कुणाचेही प्राण घेणे इत्यादी घटना नेहमीच्या झाल्या आहेत. आजचे शिक्षण आम्हाला चांगला मानव बनण्याची प्रेरणा देत नाही, तर ते आम्हाला आत्मकेंद्रित आणि भौतिकवादी बनवत आहे. “शिक्षण ही व्यक्तीचा आंतरिक विकास करण्याची आणि मनुष्याचे श्रेष्ठ मानवात रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे.”
हे आपण ध्यानात न घेतल्याने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली, तर अगदी पंधरा-वीस वर्षे वयाची मुले दारू दुकानात किंवा सिगरेट ओढताना दिसतात. बहुसंख्य वेळ मोबाईल घेऊनच असतात. आपल्या भावी पिढ्या ही वेगाने अधोगतीकडे खेचल्या जाऊ लागल्या आहेत. आपणालाही अमेरिकेतील या बातमीचे महत्त्व जाणून तातडीने अभ्यासक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे.