दापोली- दापोली तालुक्यातील जि. प. प्राथमिक मराठी शाळा देहेण तळवटकर या जिल्हा परिषदेच्या शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराचे वितरण रत्नागिरी जिल्हा परिषद सभागृहात मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
दापोली तालुक्यातील जि. प. मराठी शाळा देहेण तळवटकरवाडी ही इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची प्राथमिक मराठी शाळा असून रेवाप्पा खोत हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. नकुल कड हे या शाळेत सहायक शिक्षक आहेत. शा. व्य. समिती अध्यक्ष सेजल वनगुले यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थ, पालक व परिसरातील दानशूर हितचिंतकांच्या सहकार्यातून देहेण तळवटकर शाळा सर्वच भौतिक व शैक्षणिक सुविधांनी सज्ज आहे. शाळेला पक्क्या कंपाऊंड वाॅलबरोबरच अतिशय सुंदर अशी शालेय बाग व मैदान आहे. शाळेच्या दोन्ही वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या असून शाळेत वर्ग अध्यापनासाठी साऊंड सिस्टीम, लॅपटॉप, कंप्युटर, प्रोजेक्टर, एल. ई. डी. टी.व्ही यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शाळेची स्वतःच्या मालकीची बोअरवेल असून सर्व मुलभूत सोयींनी युक्त प्रसाधन व स्वच्छतागृहे आहेत. शाळासिद्धी प्रणालीत या शाळेस ‘ अ ‘ श्रेणी प्राप्त असून सर्व शालेय व सहशालेय उपक्रम शाळेत नियमित राबविले जातात.
देहेण तळवटकरवाडी शाळेच्या कार्यप्रणालीची व सुविधांची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेने या वर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार या शाळेस नुकताच जाहीर केला होता. सदर पुरस्कार रत्नागिरी जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या विशेष समारंभात जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जि. प. शिक्षण समिती सभापती चंद्रकांत मणचेकर, उदय बने, चारुता कामतेकर, रश्मी झगडे आदी मान्यवरांच्या हस्ते देहेण तळवटकरवाडी येथील ग्रामस्थ जयेश हुमणे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल आमडसकर व शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा खोत यांच्याकडे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
दापोली तालुक्यातील देहेण तळवटकरवाडी शाळेस यावर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल दापोली पंचायत समितीच्या सभापती योगिता बांद्रे, उपसभापती मनोज भांबिड, गटविकास अधिकारी आर. एम. दीघे, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, सुकोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकांत बापट, देहेणचे सरपंच सुरेंद्र बटावले, शा. व्य. समिती देहेण तळवटकरवाडीच्या अध्यक्ष सेजल वनगुले व सदस्य तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन कले आहे.