रत्नागिरी- प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
ब्रिटिशकालीन थिबा राजवाड्यात कलावस्तूंची आठ दालने निर्मितीसाठी पुरातत्त्व विभागाकडून तीन कोटी २२ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. यामुळे थिबा पॅलेसला नवी झळाळी मिळणार असून, तो अधिक पर्यटकांना आकर्षित करून घेऊ शकेल. हा निधी मंजूर झाल्यावर त्वरित कामे केली जाणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरीतील प्रसिद्ध थिबा राजवाड्याच्या दुरुस्तीची कामे व परिसराचा विकास अजूनही प्रलंबित आहे. हे राज्य संरक्षित स्मारक असून, जतन-दुरुस्ती योजनेतून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात आला आहे. राजवाड्याच्या छताची एक कोटीची कामे करण्यात आली. त्यानंतर प्राप्त झालेल्या निधीतून खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लाद्या आदी कामे झाली. त्यासाठी एक कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. याच निधीतून छत, गॅलरी, खिडक्या, जिने व अन्य छोटी-मोठी नूतनीकरणाची कामे पूर्ण झाली. अजूनही काही खोल्यांच्या दुरुस्तीची कामे शिल्लक आहेत. राजवाड्यात एकूण १४ खोल्या आणि दोन मोठी दालने आहेत.
थिबाराजवाडा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनावा, यासाठी राजवाड्यात आठ विविध संग्रहित कला व वस्तूंची दालने उभारण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वस्तूंचे दालन, शस्त्रास्त्रांचे दालन, विविध मूर्तींचे दालन, पुरातन नौका दालन, पुरातन वस्तू दालन, चित्रदालन अशा दालनांचा समावेश आहे. उर्वरित दोनपैकी एका दालनात जुन्या तोफा आणि दुसऱ्या दालनात जुन्या वस्तू पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. या दालनांच्या निर्मितीसाठी तीन कोटी २२ लाखांचा निधी अपेक्षित आहे. महिनाभरापूर्वी हा प्रस्ताव पुरातत्त्व विभागामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. त्यामुळे प्राधान्याने आवश्यक कामे सुरू केली जाणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.