राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पीकाचीही हानी झाली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटामध्ये सापडला असून तोंडावर असलेल्या रब्बी हंगामाची पेरणी खोळंबेल की काय, अशी भिती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीमध्ये राज्य शासनाचे शेतकऱ्यांना भक्कम पाठबळाची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना केली.
शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. परिस्थिती कशीही असो शेतकरी आपल्या कर्तव्याला कधीही चुकत नाही. त्यामुळे संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती राज्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.
मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली. याबाबत राज्यमंत्र्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेऊन चर्चा व मादरम्यान मागणी केली.