गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. 2 दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चोवीस तासात राज्यात मुंबई, कोकणसह नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भासह तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि नाशिक जिह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असल्यानं येत्या काही तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे