विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड 

0
105

मुंबई, दि. 15 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची किंवा उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे. तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व तत्सम मूल्यमापनात मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्यात येत आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परीक्षेच्या प्रात्यक्षिक/ तोंडी/ अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व व परीक्षोत्तर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांबाबत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ परीक्षा केंद्र/ परिरक्षक व संबंधित घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here