विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांत संवादात्मक उपक्रम घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी या उपक्रमाचा लाभ होत असून, आतापर्यंत चार हजारहून अधिक तक्रारींचे निवारण झाले. विभागस्तरीय सहसंचालक कार्यालयांनीही जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन असे उपक्रम घ्यावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्न सोडवण्यासाठी हा उपक्रम सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून विशेषत: अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर निकाली काढली. वेतन देयके, सातवा वेतन आयोग आदी विविध विषयांवरील तक्रारी दूर झाल्या. आज एका दिवसात तीनशेहून अधिक, तर आजपावेतो चार हजारहून अधिक तक्रारी निकाली काढल्या. हा उपक्रम एवढ्यापुरताच मर्यादित न राहता तो जिल्हास्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होतील. त्यासाठी सहसंचालक कार्यालयांनी पुढाकार घ्यावा व जिल्ह्याजिल्ह्यात दर दोन महिन्यांनी शिबिरे घ्यावीत. या उपक्रमाबाबत पुनरावलोकन व आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
या उपक्रमानंतर मंत्री महोदयांनी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यासोबतच शिक्षणसंस्था संचालकांशीही संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोरोनाकाळामुळे आर्थिक अडचणी व इतर अनेक संकटांवर खंबीरपणे मात करण्यात येत आहे. संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. अमरावती विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने अध्यासन निर्माण करण्यात येईल. कोविडचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया होत आहे. आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने सर्व बाबी तपासून प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कुलसचिव श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या उपक्रमानंतर मंत्री महोदयांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.