कोविड (Covid19)काळात राज्यातील सर्वच विभागातील डॉक्टरांनी काम केले आहे त्यामुळे या सर्वांना समान काम समान वेतन मिळावे याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असेासिएशन (निमा)(NIMA)च्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक सौरभ विजय, आयुषचे संचालक डॉ. के.कोहली, डॉ. संजय लोंढे, डॅा. शैलेश निकम, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. राजेश उताने, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ.श्रीराम रागड, सुहास जाधव, मनोज देशमुख, अनिल बाजरे, आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सर्वच विभागातील डॉक्टरांना समान काम आणि समान वेतन मिळावे यासाठी विभाग आग्रही आहे. याशिवाय शासन अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबरच खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील इंटर्न विद्यार्थ्यांनाही समान विद्यावेतन मिळावे यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)वर प्रशासकही लवकरच नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.