प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे आजारपणामध्येही वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात येत आहेत. बदलते वातावरण, दूषित पाणी आणि कोरोनाचा संसर्ग पाहता नागरिकांनी दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे रोगराईतही वाढ झाली आहे. ग्रामपंचायत पातळीवर पाणी शुद्धीकरणाला अनेक ठिकाणी प्राधान्य दिले जात नाही. मागील काही वर्षे पाणी शुद्ध करण्यासाठी मेडीक्लोर वापरले जात होते. परंतु त्याचाही प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवठा केला जात नसल्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसात सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शिवाय डासांचे प्रमाण वाढल्याने डेंगू, मलेरीया या रोगांची साथ प्रसरण्याची शक्यता अधिक असल्याने जिल्हातील ग्रामीण व शहरी भाग मच्छर मुक्त करण्याचे काम जिल्हापातळीवर राबविण्याची नितांत गरज आहे. कारण जिल्ह्यामध्ये विविध शासकीय कार्यालयातूनही याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर होत आहे.
जिल्ह्यामध्ये सर्दी, ताप, खोकला येणारे सर्वच ठिकाणी सुमारे ६० ते ७० टक्के असून अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. विविध शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी गरम पाणी पिणे गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या रोगराईत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.