सिंधुदुर्ग: अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवान सीमेवर रक्षण करत असतात. त्यामुळे आपण शांतपणे जीवन जगू शकतो. त्यांच्या दिनक्रमाचा अनुभव मी माझ्या प्रशिक्षणादरम्यान घेतला. त्याचा मला एक भारतीय म्हणून अभिमान आणि गर्व आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांनी मदत करुन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड आदी उपस्थित होते. शहीद जवानांचे स्मरण करून आणि त्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिक सदैव सीमेवर आपली सेवा बजावत असतात. ही सेवा बजावत असताना ते स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा करत नाहीत. एकाच युनिफॉर्ममध्ये ते कित्येक दिवस लढत असतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये देशासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता कामा नये. अशा माजी सैनिक, वीर पिता, वीर माता, वीर पत्नी त्यांचे पाल्य या सर्वांसाठी या निधीचा वापर केला जातो. अशा निधीत जिल्हा वासियांनी आपले योगदान देऊन जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट केवळ पूर्ण न करता ते पार करावे.
1971 च्या भारत – पाकिस्तान युद्धामध्ये प्रत्यक्ष लढलेले जवान अशोक परब आणि कयाजी देसाई यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पोलीस अधिक्षक श्री. दाभाडे म्हणाले, देशाच्या रक्षणार्थ बलिदान करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना या निधीमधून सहाय्य केले जाते. अशा निधीत प्रत्येकाने योगदान देणं याच्यासारख मोठं कार्य नाही. पोलीस दलातर्फे या पूर्वीही 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून पुढेही निश्चितच ते केले जाईल. त्याचबरोबर दलातर्फे आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. अपर जिल्हाधिकारी श्री. जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कापडणीस यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातील प्रस्तावनेमध्ये जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनी ध्वजनिधी संकलन दिनाचा इतिहास, उद्दिष्ट, महत्व, स्वरुप आणि या निधी संकलनासाठी राबवण्यात येणारे उपक्रम याबाबत सविस्तर आढावा दिला.
* कल्याणकारी निधीतून वितरीत करण्यात आलेले अनुदान. ( 2021-22 नोव्हेंबर पर्यंत ) * मुलींच्या लग्नांसाठी – 22 लाख 94 हजार 223 * अंत्यविधीसाठी – 12 लाख 30 हजार * वैद्यकीय आर्थिक मदतत – 1 लाख 81 हजार 810 * शैक्षणिक आर्थिक मदत – 4 लाख 38 हजार 500 * पुनर्वसनासाठी आर्थिक मदत – 4 लाख 7 हजार 913 * वसतीगृहावरील खर्च – 12 लाख 50 हजार 978 * दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या माजी सैनिक, विधवांना अनुदान – 40 लाख 50 हजार न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिंनीनी स्वागत गिताने सर्वांचे स्वागत केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना ध्वज लावून निधी संकलनास प्रारंभ केला.
आभार प्रदर्शन सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी गंगाराम सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन संतोष परब यांनी केले. पोलीस बँड पथकाने यावेळी राष्ट्रगित धुन वाजवून समारंभाचे सांगता केली.