कोल्हापूर : दि.11 ते 17 जानेवारी या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती वाढीस लागावी, या हेतूने विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. भारत सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण च्या अहवालानुसार देशात विद्युत अपघातामुळे सन 2020-21 या वर्षात 14 हजार 383 मृत्युच्या घटना घडल्या आहेत. विद्युत अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी वीज वापर करताना, विजेची उपकरणे हाताळताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. विद्युत सुरक्षा ही जीवन सुरक्षा आहे. जीवन सुरक्षेसाठी तपासणी, सावधानता व काळजी या सुरक्षेच्या मुलतत्वाचे पालन करूया.https://sindhudurgsamachar.in/भारत-पेट्रोलियमतर्फे-भार
अपघात म्हणजे अनपेक्षित, अनियोजित व अनैच्छिक घटना होय. परिणामस्वरूप जैविक वा वित्त हानी ओढवते. अज्ञान, फाजिल आत्मविश्वास, निष्काळजीपणा या मुळ कारणासह अपघात होण्यास असुरक्षित परिस्थिती व असुरक्षित कार्यपध्दती किंवा या दोहोंची एकत्रित परिणीती कारणीभुत ठरते. मृत्यु व गंभीर दुखापत वा कायमचे अपंगत्व, कुटूंबावर वा अवलंबितावर मानसिक आघात, आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद होणे, उपचारावर होणारा अतिरिक्त वैद्यकीय खर्च, मानसिकता ढासळून अपराध्यासारखे वा संकोच भावना वाढीस लागणे हे अपघाताचे परिणाम आहेत. विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्वांनी मनापासून विजेचा आदर करणे, नियम पाळणे गरजेचे आहे. विजेसंबंधी काम करण्यास पात्र, शारिरीकदृष्ट्या सक्षम व विचारपुर्वक काम करणारी व्यक्ति अपघात टाळू शकते. असुरक्षितपणे काम करणारी व्यक्ति ही कोणत्याही संस्थेवर व कुटूंबावर बोजा स्वरूप असते. तेंव्हा आपल्या जीवनाचे मुल्य ओळखुन शांत डोक्याने काम करणे आवश्यक आहे. कारण ‘चुकीला माफी नाही ’.
विद्युत धक्का (शॉक) म्हणजे काय?- विद्युत धक्का (शॉक) म्हणजे पेशींचे स्पंदन होय. शरीरातून 50 व्होल्ट किंवा 50 फ्रिक्वेन्सी किंवा 29 मिली ॲम्पिअर विद्युत प्रवाहाचे वहन झाल्यास पेशींचे स्पंदन होते, त्यास विद्युत धक्का (शॉक) म्हणतात. विद्युत धक्का हा विद्युत प्रवाह, विद्युत दाब, शरीराचा विरोध संपर्कात येणारे शेजारचे क्षेत्रफळ आणि वेळ यावर अवलंबून असतो. एखाद्यास विद्युत धक्का बसल्यास त्या व्यक्तिस स्पर्श न करता कोरड्या लाकडाने त्याला बाजुला करावे, त्वरित कृत्रिम श्वास देत रुग्णालयात घेऊन जावे.
विद्युत अपघाताच्या घटना व कारणे- पाणी भरण्यासाठी वापरातील विद्युत मोटारीला ओल्या हाताने स्पर्श करणे. , कपडे वाळत घालण्यासाठी विद्युत संवाहक तारेचा वापर करणे (कापडी वा विद्युत रोधक दोरी वापरावी) ती वीजखांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधल्याने वीजेचा धक्का लागणे. गच्चीवरील वाळत घातलेले कपडे वीज तारांवर जाऊन अडकल्यास ते काढताना, लहान मुले वीजतारा वरील पतंग काढताना, गच्चीवरील साफसफाई करताना, गच्चीवरील लोखंडी सळई, पाईपची हाताळणी इमारतीजवळून गेलेल्या वीजतारांशी गच्चीवरुन वा गॅलरीतून संपर्कात येणे. विद्युत उपकरणे त्यात फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर इ. मध्ये उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागणे. ठिकठिकाणी खंडीत वा जोड असलेल्या वायरातून जमिनीत, लोखंडी पत्रे, घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल(जाळी) मध्ये उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागणे. विद्युत खांब वा स्टे वायरला स्पर्श करणे. तुटून पडलेल्या विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येणे, वाहनाच्या टपावर वा मालवाहू ट्रक वा ट्रॅक्टरवर बसून प्रवास करताना विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येणे, इमारत बांधकाम वा रंगकाम करताना लोखंडी सळई, शिडीचा, कारागिराचा वीजतारांना स्पर्श होणे. वरील नमुद विद्युत अपघाताची प्रमुख व वारंवार दिसून येणारी कारणे आहेत.
विद्युत अपघात टाळण्यासाठी काय करावे- सर्वप्रथम स्विच बोर्डा अगोदर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ELCB) बसवावा, तो जीव रक्षकाचे काम करतो. विद्युत प्रवाहाची गळती झाल्यास किंवा आपण विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यास लगेच वीज पुरवठा खंडीत होतो व संभाव्य हानी टळते. वेगवेगळ्या विद्युत भाराकरीता क्षमतेप्रमाणे मिनीॲच्युर सर्कीट ब्रेकर (MCB) व मेन स्विच चा वापर करावा. त्यामुळे बाधित भागाचा वीज पुरवठा त्वरीत बंद होतो, मात्र इतर भागातील वीज पुरवठा सुरु असतो. विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अर्थिंग फार महत्वाची आहे. अर्थिंग व वायरींग सुस्थितीत असल्याची खात्री करुन खराब व आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलून घ्यावी. पाणी हे वीजसुवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड, वीजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्यासी संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. विद्युत उपकरणे हाताळताना पायात रबरी चप्पल किंवा बुट घालावा. मेन स्वीच सहज चालू बंद करता येईल अशा ठिकाणी ठेवावे. फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर, मोटार इत्यादी उपकरणांकरीता थ्री फेज पीन व सॉकेटचाच वापर करावा. आय. एस. आय. दर्जाची विद्युत उपकरणे वापरावी. प्लग साँकेट मध्ये उघड्या वायर्स खोचणे टाळावे. पॉवर पॉईंटस लहान मुलांच्या हातास लागणार नाही,अशा उंचीवर लावावे.
विद्युत अपघात टाळण्यासाठी काय करू नये – निवासी वा व्यवसायिक इमारतीमधील वीजमीटर रूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये, ती स्वच्छ ठेवावी, कुलूपबंद ठेवावी. लघुदाब, उच्चदाब किंवा अति उच्च दाब विद्युत वाहिनीखाली कोणत्याही इमारतीचे किंवा इतर बांधकाम करु नये. इमारत/बांधकाम व विद्युत वाहिन्यांमध्ये नियमानुसार पुरेपुर आडवे अंतर असायला पाहिजे. जनावरे ,गुरेढोरे वीजेच्या खांबास, ताणास तसेच विजेच्या खांबाजवळ वा तारेखाली बांधू नये. शेतीपंपाला वीज पुरवठा करणारी व अर्थिंगसाठी जोड वायर वापरू नये. ओल्या हाताने शेतीपंपाची मोटार चालू अथवा बंद करू नये. वीजेच्या तारा पडलेल्या दिसल्यास, वीजेच्या खांबावर झाडे पडलेले आढळल्यास त्या तारांना व झाडांना हात लावू नये. अनाधिकृत वीजजोडणीव्दारे वीजवापर धोकादायक व जीवघेणा ठरू शकतो. तेंव्हा थोडेसे पैसे वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. वीज तारांवर आकडे टाकताना अनेकांचा मृत्यू ओढवला आहे. शेत, घर वा व्यावसायिक जागेच्या भोवतीच्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाहित करणे हा गुन्हा आहे.
तांत्रिक कर्मचाऱ्यांनी डिस्चार्च रॉड, झुला, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, टेस्टर, विद्युत रोधक आवरणाचे पक्कड, स्क्रु ड्रायव्हर, गम बुट, रबरी हातमोजे, बॅटरी, स्पॅनर सेट, प्लायर्स, शिडी इ. सुरक्षा साधनांचा वापर करावा. नागरिकांनी आपातकालीन परिस्थितीमध्ये नजिकच्या महावितरण कार्यालयात, महावितरणच्या 24×7 ग्राहक सुविधा केंद्राचे 1800-233-3435/ 1800-212-3435/ 1912/ 19120 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले मित्र, नातेवाईक, शेजारी हे असुरक्षित वीज वापर करीत असतील तर त्यांना सावध करावे. आपण आपल्या ज्ञानाच्या,माहितीच्या बळावर ते प्रसारीत करून कोणाचे प्राण वाचवू शकतो हेच ज्ञानाचे, माहितीचे सामर्थ्य आहे.
[…] फोंडाघाट – ज्युदो स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे यांची निवड. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालय तर्फे छत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणाऱ्या ज्युदो स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे यांची निवड करण्यात आली आहे. http://sindhudurgsamachar.in/सुरक्षित-विद्युत-वापरातू/ […]