अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुणे येथील निगडी प्राधिकरण भागात सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आज सकाळी आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील दोघेही घरात होते.
सोनालीच्या वडिलांनी अजयला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले. तर हल्ला झाल्यानंतर त्या इमारतीतील इतर रहिवाशांनी अजयला पकडले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अजय शेगटेला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे खोटे पिस्तूल आणि चाकू आढळले आहे.अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. सोनाली कुलकर्णीने गेल्याच आठवड्यात कुणाल बेनोडेकर याच्याशी दुबईत लग्न केले आहे.