अवैध मासेमारीवर प्रशासनाकडून कडक कारवाईची अंमलबजावणी करण्यात यावी- जिल्हाधिकारी

0
91

मालवणमधील मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

प्रतिनिधी पांडुशेठ साटम

१ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरु झाला असून मालवण तालुक्यातील पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार,मत्स्य विभागाचे अधिकारी व मालवण येथील मच्छिमार नेत्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मच्छिमारांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून एल. ई. डी. व पर्सिनेट च्या अवैध मासेमारीवर प्रशासनाकडून कडक कारवाईची अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

अवैध मासेमारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सुचना करण्यात आली. तसेच मत्स्य विभागाला पोलिसांनी सहकार्य करणे, मालवण, आचरा जेटीवर सीसीटीव्ही बसविणे, शासनाच्या गस्ती नौका सुरु करणे याबाबतच्या सूचना बैठीकीत देण्यात आल्या. मत्स्य विभागाला कारवाईसाठी आवश्यक असलेले पोलीस कर्मचारी देण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तौकते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचा आढावा घेण्यात आला.


यावेळी मालवण तहसीलदार अजय पाटणे, सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर, मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर,सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, परवाना अधि मालवण मुरारी भालेकर, परवाना अधिकारी वेंगुर्ले चिन्मय जोशी, मच्छिमार नेते हरी खोबरेकर, छोटू सावजी, बाबी जोगी, राजू परब, अन्वय प्रभू,अतुल हुले, आकांक्षा कांदळकर, मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे आदी उपस्थित होते.

           

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here