ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.
राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा 18 जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी 25 टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.