सिंधुदुर्ग -अभिमन्यू वेंगुर्लेकर
झी मराठी’वर ‘ती परत आलीये’ या नवीन मालिकेच्या प्रोमोजने आतापासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. अभिनेते विजय कदम यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. यानिमित्ताने सस्पेन्स थ्रिलरमध्ये काम करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘ती परत आलीये’ या मालिकेत विजय कदम सूत्रधाराच्या भूमिकेत असून तब्बल आठ वर्षांनी ते छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करतायत. याविषयी ते म्हणाले, ”इतकी वर्षे मी मालिकांपासून दूर आहे. कारण इथे कामाचा व्याप खूप मोठा असतो. झी मराठीकडून जेव्हा मला या मालिकेसाठी विचारले तेव्हा मला कळलं, ही मालिका खूप वेगळी आहे. गेली 47 वर्षं रंगकर्मी म्हणून काम करताना नवनवीन आव्हानं स्वीकारायला मला आवडतं.
मी सस्पेन्स थ्रिलर खूप पाहिले आहेत. या शैलीमध्ये काम करण्याची माझी इच्छा या मालिकेमुळे पूर्ण झाली आहे.”भूमिकेबाबत ते म्हणाले, ”यात माझी व्यक्तिरेखा खेडय़ातल्या एका सर्वसाधारण माणसाची आहे. आपला आला दिवस छान घालवायचा एवढंच त्याला माहिती आहे. अशा वेळेला समोर जे घडतंय त्याच्यावर तो टीकाटिपणीपण करतोय, त्याचं स्वतŠविषयी एका कोडं आहे तेही तो अभिमानाने सांगतोय. पण पायाखालून उंदीर गेल्यावर मात्र त्याचा ससा होतो, असं हे वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. ‘ती’ कोण आहे हे मला माहिती आहे. पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्याभोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. ‘ती’ कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल,” असे ते म्हणाले.