पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी सेवेचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फ्ररसिंगव्दारे केला आहे. ई-रुपी से हा एक कॅशलेस व्यवहार असून डिजिटल पेमेंटला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. ई-रुपी योजनेचा लाभ देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे सरकारचे धोरण असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. ई-रुपी हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे, जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने विकसित केले आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल असे मोदी यांनी म्हटले आहे. जर एखाद्याला त्याच्या उपचारात किंवा अभ्यासात मदत करायची असेल तर तो रोख ऐवजी ई-रुपीद्वारे करू शकतो. यामुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळणार आहे.
या सेवेमुळे लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ थेट पोहोचणार आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल. या सेवेमध्ये वापरकर्ते कोणत्याही कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय व्हाउचर रिडीम करू शकतील. ई-रुपी द्वारे, सरकारी योजनांशी संबंधित विभाग किंवा संस्था कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय लाभार्थी आणि सेवा प्रदात्यांशी थेट जोडल्या जातील. यामध्ये एक QR कोड किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर थेट पाठवले जाते.