आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू – डॉ श्रीपाद पाटील
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोविड 19 आजाराचा नवीन स्ट्रेन ( डेल्टा प्लस ) कणकवली परबवाडी येथे सापडला आहे. या बाधीत भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे की,आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. इली, सारी आजारातील रुग्णांची व लक्षणांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबर कोविड 19 चे लसीकरणही करण्यात येत आहे. त्याशिवाय पुनःसंसर्गासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
या भागातील नागरिकांनी कोविड 19 साठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील वैयक्तित सुरक्षेबाबत नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचे नियमित पालन करावे आणि ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन ही डॉ. पाटील यांनी केले आहे.