कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

0
133

 कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकट काळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे, त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्कतेने कार्यरत रहावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-2021’ बाबत चर्चा करून हा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. आजच्या या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-2021’ एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील, सहकार्यवाह रविंद्र देसाई, कोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here