कोकणातील वातावरणातील बदल टिपणार आता ‘रडार’

0
95

सिंधुदुर्गअभिमन्यू वेंगुर्लेकर

अरबी समुद्रासह कोकण किनारपट्टीमधील हवामात होणार्‍या तिव्र बदलांच्या नोंदींसाठी रत्नागिरीत रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंजूरी मिळाली असून रत्नागिरीपासून 250 ते 300 किलोमीटर परिसरात होणार्‍या बदलांची नोंद घेतली जाईल. त्यामुळे चक्रीवादळ, कमी दाबाची क्षेत्र याची माहिती कोकणवासीयांना अचुकतेने मिळणार आहे.

इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीतर्फे (आयएमएस) ‘हवामान शास्त्र आणि हवामान सेवांमधील अलीकडील प्रगती’ या विषयावर तीनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा रत्नागिरीतील रडार यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.जगभरातील सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती गोळा करून त्याचे एकत्रिकरण केले जाते. त्यानंतर ती प्रसारीत केली जाते.

सध्या मुंबई, वेरावल आणि गोवा येथे रडार कार्यान्वित आहेत. याच धर्तीवर रत्नागिरीतही रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे रडार सी-बॅण्डचे असेल. सध्याच्या हवामानातील बदलांच्या पार्श्‍वभुमीवर प्रत्येक जिल्ह्यात रडार कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.रडार यंत्रणा चोविस तास कार्यान्वित राहते. प्रत्येक तीन ते चार तासातील अंदाज नोंदविता येतात. याचा फायदा संपूर्ण दक्षिण कोकणला होऊ शकतो. सर्वसाधारण रडारची क्षमता 250 ते 300 किलोमीटरच्या परिघातील क्षेत्र मर्यादीत आहे. मागील काही वर्षात हवामानामध्ये तिव्र बदल होते आहे.

अरबी समुद्रात वादळं निर्माण होत आहे. गतवर्षी निसर्गने ते दाखवून दिले आहे. चक्रीवादळं, कमी दाबाची क्षेत्र, जमिनीवर अवतरणारे ढग, तिव्र पाऊस या संदर्भातील निरीक्षणे रडारमुळे त्वरीत नोंदवता येतात. भारतीय हवामान खात्याकडून देशभरात काही जागांवर रडार बसविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. रत्नागिरीतील प्रकल्पाला मंत्रालयाकडून समंती मिळाली असून तो निविदास्तरावर असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here