कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
103

गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तोक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळांनी कोकणातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र हे महाविकास आघाडीचे शासन सदैव कोकणातील जनतेच्या सोबत आहे. कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीवर्धन येथे केले.

संपूर्ण कोकण परिसराचा कॅलिफोर्निया करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यादृष्टीने कोकण रेल्वे, मुंबई-गोवा हायवेचे काम, सागरी महामार्ग, आयकॉनिक पूल या काही महत्त्वाच्या बाबी आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने  हा शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेला महत्त्वाचा निर्णय आहे.  श्रीवर्धनच्या 16  ते 18 हजार लोकांसाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी या पाणी पुरवठा योजनेसाठी रु.23.13 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या जिल्ह्याला निर्सगाने खूप काही दिलेले आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटन हा महत्वाचा पर्याय आहे. येथे येणाऱ्या लोकांना, पर्यटकांना सांभाळले पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे, त्यांना चित्रीकरण वा अन्य बाबींसाठी आवश्यक परवानगी देणे, अशी सर्वप्रकारे मदत करायला हवी. या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक दिली जावी. ही फक्त शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून येथील स्थानिकांची देखील मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here